Saturday, October 21, 2017

सचिन मित्रा......

सच्याची आणि माझी भेट मंत्रालयातली....परवा पोट्ट्याचा वाढदिवस होता....वयाची तिशी गाठणारा व सोशल मीडियाच्या  विश्वात  रमणारा हा माझा मित्र अगदी मनाचा 'सच्चा'.... खूप दिवसापासून त्याच्यावर लिहीन म्हणत होतो पण शक्य झालं नव्हतं. आज माझ्या बीझी शेड्युलमधून वेळ काढून त्याच्यासाठी तोडक्या मोडक्या वैदर्भीय शब्दात लिहावंसं वाटलं.... मला माहीत आहे की, माझे हे शब्द त्याच्या मैत्रीसाठी पुरेसे नाहीत. मुंबईत आल्यापासून एखाद्या सावलीसारखा माझ्या सोबत असणारा फक्त तूच रे भावा.... मंत्रालयात काम करित असताना पुष्कळांशी पक्की, जिगरी दोस्ती झाली.. कित्येकांनी आमच्या जोडीला 'भुरड' पाडण्याचासुद्धा प्रयत्न केला पण आम्ही जावा-भावासारखे राहत गेलो. माझ्यासाठी तो एक चांगला मित्रच नव्हे तर  एक मोठा भाऊ आहे... एक डॉक्टर.... एक मार्गदर्शक... एक कौन्सिलर आणि एक गुरु बनून तो सदैव सोबत राहीलाय. प्रत्येकवेळी माझी काळजी घेणार फक्त तोच आहे. नव्या बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडसारखे आम्ही नित्यनेमाने रोज रात्री एकमेकांना फोन करित असतो, एकमेकांची काळजी घेत असतो. परवा हॉस्टेलवर एक सहकारी मित्र म्हणाला, भावा...! तू केव्हा बदलला रे ? मी विचारलं, कारे..? तर म्हणाला, तू खूपदा रात्री कोणाबरोबर बोलत असतो...घ्या..! आता मित्राबरोबर बोलणं सुद्धा त्याला लफडं वाटते..असो....सच्याच्या  वाढदिवसादिवशी तो खूप खुश होता... जणू काही तो पुन्हा लहान झालेला. त्या दिवशी आमच्या प्लॅन होता की रात्री जेवण करायला बाहेर जावं पण मुंबईच्या पावसाने आमच्या प्लॅनला फुल-स्टॉप लावला.... धोधो पाऊस असताना मी 'सच्याला' माझ्या हॉस्टेलवर घेऊन गेलो. त्याच्या वाढदिवसादिवशी त्याला मी वरणभात जेवू घातलं. त्याकरिता मित्रा मी दिलगिरी व्यक्त करतो.....सच्या मुंबईत आल्यापासून गावच्या मंडळाच्या खोलीत राहतो. 'पायमोळून' झोपतो. अत्यंत बिकट अवस्थेत तो मुंबईत स्ट्रगल करित आहे. माझ्या चर्चगेटच्या हॉस्टेलवर मुक्कामाने आल्यावर मी त्याला शांतीनं झोप घेत्यांनी पाहलं...आणि रात्री झोपतानी त्याच्या मुखी एकच सूर होता तो म्हणजे, मला मोठं व्हायचं आहे. तो मला नेहमी त्याच्या भूतकाळाविषयी सांगतो. सामाजिक जीवनापासून त्याच्यावर झालेले आरोप आणि त्यामुळे त्याच्या दुरावलेल्या प्रेमाविषयी तो खळखळणाऱ्या झऱ्यासारखा बोलत राहतो....पण एवढं 'भोगमांन' भोगू आलेल्या या सच्च्याच्या  चेहऱ्यावर सदैव स्मितहास्य असते. काल त्याने लिहलेल्या प्रत्येक पोस्टला सोशल मीडियावर लाईक, कंमेंटच्या माध्यमातून शुभेच्छाच्या वर्षाव होत होता. 'डिट' (दृष्ट) लागेल अशी त्याची लेखणी आहे पण त्याचा तिळभर त्याला गर्व नाही. एकदम शांत-संयमी आणि गरिबीची जाणं असणारा हा माझा मित्र आहे.  मंत्रालयात त्याचा स्वभाव एकदम 'बिंदास', हसमुख पण तेवढाच भावनिकही.... पोटाच्या भूखेने तो आमच्याबरोबर काम करतोय नाहीतर त्याचा मार्ग वेगळा आहे. त्याची प्रतिभा खूप मोठी आणि स्वप्नेसुद्धा गगनाला भिडणारी आहेत.  या चाकोरीमध्ये अडकून पडताना एखाद्या नवजात पिल्यासारखी त्याची अवस्था झालीय पण हार न मानता नव्या उमदीने तो झगडत आहे....दर रविवार आणि शनिवारी तो कल्याणला म्हणजे बहिणीकडे जात जातो आणि सोमवारी न चुकता माझ्यासाठी ताईने बनविलेला 'टिप्पीन' घेऊन  येतो....सच्ची जसा भावनीक तशी त्याची  बहिणसुद्धा भावनिक आहे, हे मला 'टिप्पीन' खाताना जाणवलं कारण तो नुसता भाताचे 'डल्ले' गिळतो आणि माझ्यासाठी मात्र पोळीभाजी घेऊन येतो. जेवण करताना सदैव आपल्या बहिणीविषयी बोलत असतो. ते ऐकून माझ्या  डोळ्यातून अलगद  पाणी येतं कारण मला सख्खी बहिण नाही... सचिनची मुंबईत काळजी घेणारी तीच एक माउली आहे. पण ती ताई माझ्यासाठी जो 'टिप्पीन' पाठवते त्यामुळे मला थोडं का होईना बहिणीचं प्रेम मिळतं. मंत्रालयात आमची जोडी म्हणजे फेमस जय-वीरूची म्हणावी लागेल. दररोज माज न करता उत्तर भारतीयाच्या टप्परीवर बसून ३५ रुपयाची थाळी खाणारे आम्हीचं...मी पूर्ण शाहाकाहारी असून सच्च्या मांसाहारी आहे पण कधी तक्रार न करता माझ्यासाठी तो शाकाहारी झाला. जेवत असतानी तो विदर्भय हिंदी बोलतं असतो....  
                       "क्या बे लवकर लवकर खा बे .... सर बोबले गे".... मला हसू येते....आणि लगेच तो बोलतो "अपनी हिन्ही अच्छी होय रलय" भावाचं हिंदीवर आणि खास म्हणजे विदर्भातील लोकांवर लय प्रेम दिसते.... कधीमधी म्हणतो, 'क्या बे साले तेरे विदर्भ के लोग तेरे ही जैसे नगीने होते है.... क्या ?' त्याचा हा प्रश्न पाहून मी 'लालभड़क' होतो पण त्यावर तो हसत म्हणतो, 'साले तू मेरा सबसे अच्छा दोस्त है' भावाचं वाचन म्हणजे अफलातून, त्याच्यामुळे मला वाचनाची सवय लागली.... आमच्यासाठी मंत्रालयातील पहिला पगार म्हणजे खूप महत्वपूर्ण होता पण आम्ही तो पगार स्वतःच्या मेकपवर खर्च न करता 'जातियनं' लायब्ररी लावण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एकूण ५ हजार रुपये लागत होते. मला कधीही एवढे पैसे खर्च करण्याचा अनुभव नव्हता आणि ते करण्याच्या मनस्थितीतही नव्हतो पण भावाच्या जिद्दीसमोर मीपण नतमस्तक झालो. दुसऱ्याच दिवशी आईला फोन लावला. या सत्यकर्मास आईने लगेच होकार दिला. मित्रा..! तू दिलेल्या आत्मविश्वामुळे मी हे साध्य करू शकलो नाहीतर ते शक्य झाले नसते.... सच्याला मी माझ्या मनातली अस्वस्थता शेअर करतो तेव्हा मला धीर देण्याच्या ठेका जणू काही त्याने घेतलाय असं वाटते, म्हणतो (बे साल्या सर्व ठीक होईल)  मंत्रालयातील या काळात खूप चांगले आणि वाईट अनुभव आले. पुष्कळ लोकांनी माझा भाषेवर, राहणीमानावर टिप्पणी केल्या पण  सच्च्याने माझ्या विदर्भीय भाषेवर लय प्रेम केले. या काळात माझ्यावर त्याने चक्क तीन ते चार लेख लिहले. मी तर त्याचे हे उपकार फेडू शकत नाही. फक्त या निराश झालेल्या मनाला आधार फक्त तूच दिलास....तूच मला क्षणोक्षणी हसवत राहिलास.. मित्रा तूझं माझ्या आयुष्यात येणं मला नवा जन्म देऊन गेलं .... बस, इतकचं मित्रा..! तुझ्यावर बोलण्यासाठी शब्दसुद्धा अपुरे पडत आहेत... 
नितीन बिनेकर

No comments:

Post a Comment