Wednesday, August 24, 2016

भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक : डॉ. एस. आर. रंगनाथन

जगभरात ग्रंथालयशास्त्रात नावलौकिक करणारे प्रथम भारतीय ग्रंथपाल व ग्रंथालय चळवळीचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे डॉ. एस. आर. रंगनाथन ज्यांच्या कर्तृत्वाने भारताला ग्रंथालय क्षेत्रात जागतिक प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. अशा या महान व्यक्तीची 12 ऑगस्ट रोजी 124 वी जयंती आहे. या निमित्ताने ग्रंथालय प्रेमींसाठी त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा थोडक्यात परिचय. त्यांच्या जन्मदिनानिमित्त ग्रंथपाल दिन देशभरात साजरा केला जातो.


ग्रंथालय हे सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी शालेय शिक्षणासोबतच निरंतर शिक्षणदेखील किती आवश्यक असते, यांचे महत्व ग्रंथालयशास्त्राचे पितामह डॉ. रंगनाथन यांनी सर्वप्रथम पटवून दिले आहे. त्यासाठी ग्रंथालयाचा विकास, प्रसार होऊन देशातील सर्वसामान्य जनतेसाठी ज्ञानाची कवाडे विनामूल्य खुली करून द्यायला हवी. यासोबतच वाचन संस्कृती रुजविण्यासाठी व जनतेला वाचनाकडे प्रवृत्त केले पाहिजे, असा विचार डॉ.रंगनाथन यांनी सर्वप्रथम देशात रुजविला. देशातील ग्रंथालय चळवळीची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

डॉ. रंगनाथन यांचा जन्म 12 ऑगस्ट 1892 रोजी तत्कालिन मद्रास प्रांतातील तंजावर जिल्ह्यातील शियाली या गावात झाला. शालेय शिक्षण शियालीला आणि महाविद्यालयीन शिक्षण मद्रास येथे झाले. 1916 साली त्यांनी गणित या विषयात पदवी मिळविली. अध्यापनाची आवड असल्याने त्यांनी अध्यापन हे आपले कार्यक्षेत्र निश्चित केले. १९१७ साली मद्रास विद्यापीठातील अध्यापन शास्त्रातील एल.टी. ही पदवी त्यांनी प्राप्त केली. या काळात एक कुशल प्राध्यापक संशोधक म्हणून त्यांनी मान मिळविला होता. 1924 रोजी प्रेसिडेन्सी कॉलेजमधील नोकरी सोडून ते मद्रास विद्यापीठाचे ग्रंथपाल म्हणून सेवेत रुजू झाले. तेव्हा मद्रास विद्यापीठाने त्यांना सप्टेंबर 1924 ते जुले 1925 या कालखंडात ग्रंथालयाच्या प्रशिक्षणासाठी आणि ग्रंथालयाचा अभ्यास करण्यासाठी इंग्लडला पाठविले.

इंग्लंड येथे एक वर्ष राहून तेथील युनिव्हर्सिटी कॉलेजचा ग्रंथालय शास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण करून 1925 साली मायदेशी परतल्यावर डॉ. रंगनाथन यांनी विद्यापीठाच्या ग्रंथालयाच्या पुनर्रचनेचे कार्य जोमाने सुरु केले. विविध कार्यक्रम व उपक्रमाद्वारे ग्रंथालयात चैतन्य निर्माण केले. म्हणजेच मद्रासच्या वास्तव्यात त्यांनी भारतीय ग्रंथालय चळवळीचा पाया घातला. मद्रास विद्यापीठाचा कायापालट करीत असतानाच त्यांच्या मनात सार्वजनिक ग्रंथालयाच्या प्रसाराचा विचार सुरु झाला होता. आर्थिक विकासाला आणि लोकशाहीच्या प्रगतीला शिक्षण प्रसाराइतकी मुलभूत कोणतीही प्रेरणा नाही, अशी त्यांची धारणा होती. समाजातील सर्वांना शिक्षण प्रसारासारखी म्हणजेच ज्ञानाचे लोकशाहीकरण करण्यासाठी ग्रंथालयाइतके सहाय्यक दुसरे माध्यम कोणतेच नाही, अशी त्यांची धारणा होती. हे लक्षात घेऊन त्यांनी मद्रास ग्रंथालय संघाची स्थापना 1928 रोजी केली. या संघाचे चिटणीस व पदाधिकारी म्हणून 1945 पर्यंत काम केले. या संघाच्या स्थापनेची आणि त्यांच्यातर्फे मांडल्या जाणाऱ्या विविध योजनापासून स्फूर्ती घेऊन इतर राज्यात ग्रंथालय संघ स्थापन झाले आणि सार्वजनिक चळवळीला नवीन तेज आले.

डॉ. रंगनाथन यांच्या विविध उपक्रमामुळे ग्रंथालयाच्या आवश्यकतेची जाणीव समाजात निर्माण होऊ लागली. त्यामुळे प्रत्येक राज्यात सार्वजनिक ग्रंथालये स्थापन करण्यासंबंधी कायद्याची जाणीव निर्माण झाली. त्यासाठी त्यांच्या पुढाकाराने मद्रासमध्ये सार्वजनिक ग्रंथालय कायदा अंमलात आला. त्यामुळे दक्षिण भारतात सार्वजनिक ग्रंथालयाची वाढ मोठ्या प्रमाणात झाली. त्यांच्या प्रेरणेने ग्रंथालय कायदा करणारे मद्रास हे भारतातील पहिले राज्य ठरले. डॉ. रंगनाथन यांचा कार्यकाळ भारतीय ग्रंथालय शास्त्रातील हे पर्व ऐतिहासिक ठरले आहे. आजही ग्रंथालय शास्त्रातील त्यांचे अजरामर व अमूल्य सिद्धांत, विविध सूत्रे, नियम आदर्श मानले जातात.

ग्रंथालयशास्त्राच्या विविध पैलूंपैकी प्रत्येक पैलूंची डॉ. रंगनाथन यांच्या वैचारिक परिसस्पर्शाने सोने झाले आहे . ग्रंथालयशास्त्रातील 1930 चे दशक विशेषत्वाने क्रांतिकारी ठरले. याच दशकात डॉ.रंगनाथन यांनी ग्रंथालयशास्त्राचे पाच सूत्र कोलन क्लासिफिकेशन, क्लासिफाईड कॅटलॉग कोड, ग्रंथालय प्रकाशन प्रोलेगोमिना टू लायब्ररी, क्लासिफिकेशन थिअरी ऑफ लायब्ररी तसेच रेफरन्स सर्व्हिस अॅण्ड बिबलिओग्राफी इत्यादी अमूल्य ग्रंथाचे लेखन व प्रकाशन केले. त्यांनी या क्षेत्रातील घोडदौड पुढे चालू ठेवून त्यांनी 1931 मध्ये मद्रास बैलगाडीतील पहिल्या फिरत्या ग्रंथालयाची सुरुवात केली.

डॉ. रंगनाथन यांनी 1936 मध्ये प्रथम लायब्ररी बील मद्राससाठी तयार केले. ग्रंथालयशास्त्रातील प्रमाणपत्र तसेच पदविकास्तरावरील अभ्यासक्रमाचे प्रारूप तयार करून ग्रंथालयशास्त्र शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जगभरात आपली नवीन ओळख निर्माण केली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या कामाची व संशोधन कार्याची योग्य दखल घेऊन ब्रिटीश सरकारने 1935 साली डॉ. रंगनाथन यांना रावसाहेब हा पुरस्कार दिला. त्यानंतर त्यांनी स्वकष्टाने जमा केलेले एक लाख रुपये मद्रास विद्यापीठाला देणगी म्हणून दिले.

ग्रंथालयशास्त्रातील प्रमाणपत्र बी. लिब., एम. लिब. इत्यादीसाठी अभ्यासक्रम तसेच शारदा रंगनाथन विज्ञान संघटन आणि शारदा रंगनाथन ग्रंथालय शास्त्रपीठ यांची स्थापनाही ऐतिहासिक क्षणामध्ये आजपण गणली जाते.

भारत सरकारने 1957 मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. मौलिक लिखाणाबद्दल डी. लिट. ही सर्वोच्च पदवी 1947 साली आणि 1964 साली अमेरिकेतील पिटर्सबर्ग विद्यापीठाकडून त्यांना मिळाली होती. वर्गीकरण व तालिकाकरण या विषयातील संशोधनाबद्दल त्यांना १९७० साली अमेरिकन लायब्ररी असोसिशनकडून मार्गारेड हे पारितोषिक देण्यात आले आहे. रंगनाथन यांनी भारतीय ग्रंथालय चळवळही वाढवली. भारतीय ग्रंथालय परिषदांचे अध्यक्ष म्हणून त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्याचप्रमाणे युनेस्को इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ असोशिएशन व इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ डाँक्युमेन्टेशन यासारख्या आंतरराष्ट्रीय समित्यावरही त्यांनी उल्लेखनिय कामगिरी केली.

डॉ. रंगनाथन यांच्या कार्याच्या स्मरणार्थ ग्रंथालय चळवळीत योगदान देणाऱ्या सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातील कार्यकर्ते, सेवक यांनी अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून महाराष्ट्र सरकारच्या वतीने उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व उत्कृष्ट ग्रंथालय सेवकासाठी ‘एस आर रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार' देण्याच्या अभिनव योजना सन 1993-94 पासून सुरु केलेली आहे. त्यामध्ये राज्यस्तरावरील एकेक कार्यकर्ता व सेवक यांना रुपये 25 हजार तसेच राज्यातील सहा महसुली विभागातून एकेक कार्यकर्ता व सेवक यांना रुपये 15 हजार, गौरवचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येते.

रंगनाथन यांच्या कार्याविषयी कितीही लिहिले तरी ते कमीच आहे. त्यांच्या कार्याची व्याप्ती अतुलनीय आहे. म्हणूनच डॉ. रंगनाथन यांनी मांडलेले ‘पाच पुस्तकालय विज्ञान’ हे सिद्धांत भारतीय पुस्तकालय विज्ञानाचा पाया समजला जातो. डॉ रंगनाथन यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतीय ग्रंथालयाच्या विकासासाठी अर्पण केले. अशा या महान व्यक्तीला विनम्र आदरांजली.

-नितीन शं. बिनेकर

No comments:

Post a Comment