Sunday, August 28, 2016

मुंबई विद्यापीठ : एक सिंहावलोकन

मुंबई विद्यापीठाच्या 159 व्या वर्धापन दिन व 160 व्या वर्षमहोत्सवाचा शुभारंभ 18 जुलै 2016 रोजी विद्यापीठात एका शानदार समारंभात झाला. विद्यापीठाला 159 वर्षाची समृद्ध आणि वैभवशाली परंपरा लाभली आहे. हे भारतातील सर्वात जुने विद्यापीठ असून भारतातील पहिल्या तीन विद्यापीठांपैकी एक असा मान मुंबई विद्यापिठाने पटकवला आहे. विद्यापिठाच्या आजवरच्या वाटचालीचे हे एक सिंहावलोकन.

मुंबई विद्यापीठाची स्थापना सन चार्ल्स वुड यांच्या इ.स. 1854 च्या शिक्षणविषयक कायद्याअंतर्गत डॉ. जॉन विल्सन यांनी 18 जुलै 1857 रोजी केली. पूर्वी बॅाम्बे असे नामकरण होते, पण बॉम्बेचे मुंबई झाल्यामुळे 4 सप्टेंबर 1996 रोजी ‘बॅाम्बे’ विद्यापीठाऐवजी मुंबई विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले.

ऐतिहासिक परंपरा

विद्यापिठाचे स्वरुप सुरुवातीस वेगवेगळे अभ्यासक्रम तयार करुन परीक्षा घेणारी व पदवी देणारी संस्था असे होते. त्यावेळी मुंबई राज्याचे गव्हर्नर हे विद्यापिठाचे कुलपती असत. मुंबईचे पहिले गव्हर्नर लॉर्ड जॉन एन्फिन्स्टन हे मुंबई विद्यापिठाचे प्रथम कुलपती तर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर विल्यम यार्डले हे पहिले कुलगुरू होते.

पहिले पदवीधर

माध्यमिक शालान्त परीक्षा कायदा होईपर्यंत मॅट्रिकच्या परीक्षा घेण्याचे काम 1948 पर्यंत मुंबई विद्यापिठाकडून होत होते. 1859 साली पहिली मॅट्रिकची परीक्षा झाली. या परीक्षेत 132 मुलांपैकी 22 मुले उत्तीर्ण झाली. प्रथम वर्ष (कला) परीक्षा 1881 मध्ये झाली. त्यात पहिल्या मॅट्रिकच्या तुकडीतील 15 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी सात विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या सातपैकी पहिल्या पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षात सहा विद्यार्थी बसले. त्यापैकी चार उत्तीर्ण झाले. मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर होण्याचा हा मान महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, बाळ मंगेश वागळे आणि वामन आबाजी मोडक यांनी पटकावला.
मदतीचा हात

पहिल्या 17 वर्षांच्या कालावधीत विद्यापिठाची स्वत:ची इमारत नव्हती. विद्यापिठाची कचेरी टाऊन हॉलमध्ये होती. सिनेटच्या बैठका व पदवीदान समारंभही याचठिकाणी होते. 1869 मध्ये कावसजी जहाँगीर रेड्डीमनो यांनी विद्यापिठास इमारतीसाठी एक लाख रुपयाची देणगी दिली. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विद्यापिठाच्या पदवीदान सभागृहास ‘सर कावसजी जहाँगीर हॉल’ असे नाव देण्यात आले. त्याचप्रमाणे 1864 मध्ये प्रेमचंद यांनी ही दोन लाख रुपयांची देणगी ग्रंथालयासाठी दिली. काही काळानंतर प्रेमचंद यांनी आपल्या मातोश्री राजाबाई यांच्या


स्मरणार्थ मनोरा बांधण्यास आणखी दोन लाख रुपये दिले. त्यामुळे त्यांच्या आईच्या नावाने ‘राजाबाई टॉवर’ असे नामकरण करण्यात आले.
शिक्षण पद्धतीत अग्रेसर
जगभरात शिक्षण क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. हे बदल वेळोवेळी मुंबई विद्यापिठाने अंगिकारले. या बदलांची योग्य सांगड मुंबई विद्यापिठाने घातली आहे. मुंबई विद्यापिठातर्फे 56 पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविले जातात. यात कला, वाणिज्य, अभियांत्रिकी, मानसशास्त्र व्यवस्थापन, ललित कला, विज्ञान, भाषा कायदा यासारख्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या पारंपरिक अभ्यासक्रमांबरोबरच प्रसार माध्यमे, विमान उड्डाण असे नवनवीन अभ्यासक्रमही शिकविले जातात. विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण मिळावे याची कास धरणाऱ्या मुंबई विद्यापिठाने कम्युनिटी कॉलेजेस सुरु केली आहेत. विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख अभ्यासक्रम शिकविता यावेत म्हणून नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरु केले आहेत. उच्च दर्जाचे शैक्षणिक संशोधन व्हावे यासाठी जवळपास चार लाखाहून अधिक रिसर्च जर्नल्स ऑनलाईन उपलब्ध करुन दिली आहेत.

भारतातच नव्हे तर जगाच्या पाठीवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वैज्ञानिक संशोधनाला चालना मिळावी यासाठी सूक्ष्म विज्ञान क्षेत्रात आमुलाग्र बदल करत नॅनो सायन्स आणि टेक्नॉलॉजी हे अद्ययावत विभाग सुरु करण्यात आले आहेत.

कार्यक्षेत्रात वाढ

मुंबई विद्यापिठाने 1913 सालापासून पदव्यूत्तर शिक्षण देण्याचे कार्य सुरु केले. महाविद्यालयासाठी लागणारी क्रमिक व अन्य पुस्तके तयार करणे ही कार्ये विद्यापिठाकडेच होती. पुढे 1928 च्या अधिनियमानुसार विद्यापिठाच्या सिनेटची पुनर्रचना अधिक प्रातिनिधीक स्वरुपाची झाली. पदव्यूत्तर शिक्षण व संशोधन हे विद्यापिठाच्या कक्षेत आले. त्यानुसार संलग्न महाविद्यालयात पदव्यूत्तर शिक्षण विद्यापिठाच्या विभागाद्वारे देण्यास प्रारंभ झाला. यामुळे विद्यापिठाच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. आजच्या घडीला 729 महाविद्यालये असून 56 विद्यापीठ विभाग आहेत. यातील विद्यार्थ्यांची संख्या सात लाखाहून अधिक आहे. महाराष्ट्र शासनाने 1974 मध्ये राज्यातील सर्व विद्यापिठाच्या कार्यप्रणालीत एकसूत्रता आणण्यासाठी कायदा केला. यामुळे मुंबई विद्यापिठाच्या कार्यक्षेत्रात वाढ झाली.

159 वर्षात विद्यापिठाने दिले अनेक महापुरुष

1857 च्या उठावात देशात ब्रिटीश राजवटी विरोधात जनतेमध्ये विद्रोह निर्माण झालेला होता. या परिस्थितीत विद्यापिठाची स्थापना झाली. जिथे अनेक विचारवंत क्रांतीकारक आणि महापुरुष निर्माण झाले. त्यांनी ब्रिटीश जुलमी राजवटीचा सूर्यास्त होण्याची सुरुवात झाली. या काळात मुंबई विद्यापिठातून शिकलेल्या अनेकांनी जगाच्या पाठीवर आपल्या कर्तृत्वाची छापच उमटवली आहे. ज्यात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दादाभाई नौरोजी, सरदार वल्लभभाई पटेल अशा अनेक दिग्गजासंह विविध क्षेत्रात अग्रेसर असलेले दिग्गज या विद्यापिठाचे विद्यार्थी होते. ही बाब केवळ मुंबई विद्यापिठालाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राला भूषण वाटेल, अशीच आहे.
विद्यापिठाच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

-नितीन बिनेकर,

(9970420736)

No comments:

Post a Comment